New Palace Kolhapur
न्यू पॅलेस कोल्हापूर
.
.
.
' कसबा बावडा ' मार्गावरील हा प्राचीन व ऐतिहासिक राजवाडा आहे . घासून तुळतुळीत काळ्या दगडाने बांधलेला हा राजवाडा म्हणजे वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमूना आहे . पर्यटकांचे खास आकर्षण आहे . मध्यभागी उंच मनोरा असलेल्या राजवाड्यास आठ कोन आहेत . मनोऱ्यावरील घड्याळ १८८७ साली बसविले आहे . इतर दोन मनोरे निरनिराळ्या अंतरावर आहेत . ही वास्तू म्हणजे ' छत्रपती राजर्षी शाहू महाराज ' यांचे निवासस्थान . आज या राजवाड्याचे रूपांतर महाराजांच्या वस्तूसंग्रालयामध्ये झाले आहे . आजही येथे महाराजांचा दरबार त्याच्या जीवनाशी संबंधीत वस्तू पुरावे पाहायला मिळतात.
• छत्रपती राजर्षी शाहू महाराज
जन्म : २६ जून इ.स. १८७४ कागल , कोल्हापूर
राज्याभिषेक : २ एप्रिल १८९४
मृत्यू : ६ मे १९२२ , मुंबई
राज्यव्याप्ती : कोल्हापूर जिल्हा
चौथे शाहू , अर्थात छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती होते . सामाजिक क्रांतीचे अग्रदूत , सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाचे नवीन जीवन देणारे आरक्षणाचे प्रणेते . शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला . त्यांनी कोल्हापूर संस्थांनात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले . स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली . अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी १९१९ साली सवर्ण आणि अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली . जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला . इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली . शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल शाहूपुरी , व्यापारपेठ , शेतकऱ्यांची शेतकरी संस्था शेतकी , तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी 'किंग एडवर्ड अँग्रिकल्चर इन्स्टिटयुट' इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापन करण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता . राधानगरी धरणाची उभारणी , शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले . त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी , तसेच मुकनायक वृत्तपत्रासांठीही सहकार्य केले होते . त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले. स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्षे आधी समता , बंधुता , धर्मनिरपेक्षता सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे राजर्षी शाहू महाराजांनी करवीर संस्थानात आमलात आणली . म्हणूनच त्यांचा देशभरात " महाराजांचे महाराज " असा गौरव होतो . शाहू महाराजांना " राजर्षी " ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली .



Mst ree 💞💞💖✌️
ReplyDelete